डॉ. तेजस पाचपुते यांची राष्ट्रीय फार्मसी वेल्फेअर असोसिएशन पुणे जिल्हा ग्रामीणविभागीय अध्यक्षपदी नियुक्ती.

नारायणगाव ( प्रतिनिधी) नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन (NPWA) पुणे या राज्यस्तरीय संघटनेच्या महाराष्ट्रातील कार्यविस्ताराचा एक भाग म्हणून पुणे जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदी डॉ. तेजस शिवराम पाचपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
NPWA ही फार्मसी क्षेत्रातील अडीअडचणी व त्यामधील विकास यासंबंधी कटिबद्ध अशी देशव्यापी संघटना आहे. तसेच फार्मसी संबंधातील शासनाची ध्येय धोरणे याबाबतीमध्ये अनेक अमुलाग्र बदल करण्यासंबंधी या असोसिएशनचे कामकाज सुरू आहे.
डॉ. तेजस पाचपुते हे जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहाणी, पुणे येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असून त्यांना फार्मसी शिक्षण, औषध व्यवसाय, संशोधन व संघटनात्मक कार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. फार्मसी क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सकारात्मक व प्रभावी भूमिका घेणारे युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील फार्मासिस्ट, औषध विक्रेते, विद्यार्थी व औषध व्यवसायाशी संबंधित घटकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे मांडल्या जातील तसेच व्यावसायिक हक्क प्रशिक्षण रोजगार संधी व फार्मसी सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी संघटनेमार्फत ठोस कार्य केले जाईल असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष डॉ. सचिन कोतवाल, उपाध्यक्ष डॉ. अमोल शहा, सचिव डॉ. संपत नवले, कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण जावळे यांनी व्यक्त केला.
डॉ. तेजस पाचपुते यांच्या निवडीबद्दल जयहिंद कॉम्प्रेन्सिव्ह एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, सचिव विजय गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांची नियुक्ती ही संस्थेसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन पुणे ग्रामीणविभागीय अध्यक्ष म्हणून असोसिएशनचे सदस्य जाळे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये निर्माण केले जाईल. तसेच असोसिएशनच्या माध्यमातून फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थी व सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील. सदर नियुक्ती बाबत डॉ. तेजस पाचपुते यांनी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
या नियुक्ती मुळे पुणे जिल्ह्यातील फार्मसी क्षेत्रामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.



