शेती क्षेत्रात ग्राहक संरक्षण अधिक बळकट करण्याची गरज– शेखर गायकवाड, साखर आयुक्त (सनदी अधिकारी)

पुणे | दि (14) राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने बोलताना साखर आयुक्त तथा सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी शेती क्षेत्रातील ग्राहक संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “शेतकरी हा केवळ उत्पादक नसून तो बियाणे, खते, औषधे व कृषी निविष्ठांचा मोठा ग्राहक आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी शेती क्षेत्रासाठी अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आज शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाची बियाणे, भेसळयुक्त खते व बनावट कीटकनाशके यांमुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा फसवणुकीचा परिणाम केवळ शेतकऱ्यांवरच नव्हे, तर देशाच्या अन्नसुरक्षा व ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम करणारा आहे, असे त्यांनी सांगितले.
“ग्राहक संरक्षण कायदा हा शहरापुरता मर्यादित नसून तो शेतकऱ्यांनाही समानपणे लागू आहे. शेतकऱ्यांनी जागरूक ग्राहक म्हणून बियाणे, खते व औषधे खरेदी करताना बिल घेणे, दर्जाची खात्री करणे आणि फसवणूक झाल्यास तात्काळ तक्रार दाखल करणे आवश्यक आहे,” असे आवाहन गायकवाड यांनी केले.
यावेळी बोलताना शेखर गायकवाड यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्याचे विशेष कौतुक केले. “ग्राहक संरक्षण कायद्याच्या निर्मितीपासून ते त्याची अंमलबजावणी सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सातत्याने केले आहे.अखिल भारतीय ग्राहक चे संस्थापक बिंदुमाधव जोशी यांनी सुरू केलेली ही चळवळ आज देशभर ग्राहक जागृतीचे प्रभावी माध्यम ठरत आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने विविध ठिकाणी ग्राहक प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात आले. त्याचा समारोप आज नारायणगाव येथे पार पडला. या समारोप समारंभात शेखर गायकवाड बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब औटी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर, नाशिक मा उपायुक्त सुखदेव बनकर, तालुका कृषी अधिकारी अनिल भोसले, सुजित खैरे, गुणनियंत्रण कृषी अधिकारी ज्योतिराव जाधव, प्रांत सहकोषाध्यक्ष ज्ञानेश्वर उंडे, कृषी विज्ञान मंडळाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत शेटे ,जिल्हा सचिव अशोक भोर, जुन्नर तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे, पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुलकर्णी, प्रशिक्षक समन्वय वसंत कोल्हे , पोलीस निरीक्षक किरण अवचर जुन्नर, पोलीस निरीक्षक आळेफाटा विश्वास जाधव, एपीआय लहू धाटे, रमेश जंगले आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब औटी म्हणाले की ग्राहक चळवळ भारतीय अर्थव्यवस्थेतील शुद्धीकरणाचा एक प्रकल्प आहे भारतीय समाजाला शोषणमुक्त करण्याचे काम ग्राहक पंचायत करीत आहे म्हणून कार्यकर्त्यांनी ही ऊर्जा प्रत्येक तालुक्यापर्यंत गावापर्यंत पोहोचवावे असे प्रतिपादन ग्राहक पंचायतीचे प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी केले यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की या देशातील ग्राहक जागृत नसल्याने अनेक प्रश्न आहेत ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून शोषणमुक्तीचा सिद्धांत उभा राहिला पाहिजे अशोक चक्राला ग्राहक पंचायतीच्या सुदर्शन चक्राची जोड दिली पाहिजे आर्थिक क्षेत्रात नवनिर्माण झाले पाहिजे.
गाव तिथे ग्राहक पंचायत हा विचार उभा राहिला पाहिजे अर्थव्यवस्थेचे शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे १९७४ला ग्राहक पंचायत सुरू झाली आता त्याला ,५१वर्षापासून ही चळवळ काम करीत आहे ही चळवळ देशात सर्वांना मान्य झाले आहे असेही याप्रसंगी बोलताना औटी यांनी सांगितले करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने पुढील दोन वर्षांसाठी ठोस नियोजन केले आहे.”
ते पुढे म्हणाले की, “ग्राहक शक्ती, प्रशासन शक्ती आणि न्यायालयाची दंडशक्ती एकत्र आल्यासच खऱ्या अर्थाने कल्याणकारी स्वराज्य निर्माण होईल. अखिल भारतीय ग्राहक पंचायत गेली ५१ वर्षे ग्राहक शक्ती जागृत करून संघटनाचे कार्य करत आहे. स्वतंत्र ग्राहक न्यायालये आणि प्रशासनात स्वतंत्र ग्राहक कल्याण खाते निर्माण होणे ही या चळवळीची मोठी फलश्रुती आहे. आता गावोगावी, तालुका व जिल्हा स्तरावर स्वयंसेवी कार्यकर्त्यांचे जाळे उभे करणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रस्ताविक ज्ञानेश्वर उंडे यांनी केले, स्वागत ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले, सूत्रसंचालन वलवनकर यांनी केले तर आभार सुनील गुंजाळ यांनी मानले. यावेळी अनेक नागरिकांना रेशन कार्डचे वितरण करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांचा फळांची रोपे देऊन सन्मानित करण्यात आले



