ताज्या घडामोडी
अभिनेता सत्यवान गागरे यांना जी आय एफ आय चा उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहिर

आळेफाटा ( दि १२) प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद एडिटोरियम, कलकत्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्लोबल इंडिपेन्डन्ट फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील महोत्सवाच्या तिसऱ्या पर्वात वडगाव आनंद गावचे सुपुत्र श्री सत्यवान प्रभाकर गागरे यांना तिसऱ्या क्रमांकाचे उत्कृष्ट अभिनेता पारितोषिक जाहीर करण्यात आले.
एम आय टी विश्वशांती विश्वविद्यालयाच्या लिबरल आर्टस् या विभागाची निर्मिती असलेल्या एच आय व्ही जन जागृतीवर आधारित माय फॅमिली या लघुपटाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला आहे. आनंदी कुटुंबातील कर्त्या पुरुषाला जेव्हा एच आय व्ही आजार झाल्याची माहिती मिळते त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य व समाजाकडून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो त्यातून त्या पुरुषाची मानसिकता कशी बदलते, तसेच समाजाकडून त्याची हेटाळणी कशी होते हे या लघुपटात दर्शविण्यात आले आहे. या लघुपटामध्ये डॉ अनुराधा परासर व श्री सत्यवान गागरे यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे तर अक्षता सावंत यांनी दिग्दर्शन केले आहे,
विशेष म्हणजे यामध्ये एकही संवाद नाही, या लघुपटात प्रमुख भूमिकेकरिता श्री सत्यवान गागरे यांना आजपर्यंत वर्ल्ड फिल्म कार्निवल सिंगापूर, हेलिकॅरनसीसी फेस्टिवल तुर्कस्थान, पॅरिस सिनेमा अवॉर्ड्स पॅरिस, इंटरनॅशनल मलाक्का फिल्म फेस्टिवल मलेशिया,टागोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पश्चिम बंगाल, पोर्ट ब्लेअर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अंदमान निकोबार, द्रूक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल भूतान यासारख्या अनेक महोत्सवांमधून उत्कृष्ट अभिनेता या पुरस्करांनी गौरविण्यात आले आहे व उत्कृष्ट निर्मिती, दिग्दर्शन यासाठी देखील पुरस्कार मिळाले आहेत.
या यशाबद्दल एम आय टी चे संस्थापक डॉ. विश्वनाथ दा कराड, कार्याध्यक्ष श्री. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर एम चिटणीस, रजिस्ट्रार श्री. गणेश पोकळे, डीन प्रोफेसर डॉ. संतोष कुमार यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.



