स्वार्थापायी आज नाणे गुरुजी निर्माण झालेले आहेत, त्यामुळे साने गुरुजी दिसून येत नाहीत =प्रा. फ. मु. शिंदे

खोडद -( प्रतिनिधी) ” आपल्या हृदयामध्ये कायम प्रेम व करुणा वसत असली पाहिजे. वात्सल्याचा स्वच्छ पाण्याचा झुळझुळ वाहणारा झरा आपल्यात जिवंत असायला हवा.अष्टौप्रहर ममत्वाचे अस्तित्व आपणा सर्वांमध्ये सदोदित नांदत असावे, हे आपल्याला पूज्य साने गुरुजींनी शिकविले आहे. गुरुजींच्या विचारांचा वसा घेऊन, समाजात कार्यरत असलेल्या धडपडणाऱ्या मुलांची आज कमतरता आढळून येते आहे. स्वार्थापायी आज नाणे गुरुजी निर्माण झालेले आहेत, त्यामुळे साने गुरुजी दिसून येत नाहीत.” असे प्रतिपादन सासवड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.फ.मु.शिंदे यांनी केले.
साने गुरुजींची आई यशोदा व वडील सदाशिवराव यांचे पुण्यस्मरण आणि साने गुरुजींची जयंतीच्या निमित्ताने ‘ श्यामची आई सेवा समिती महाराष्ट्र’ या संस्थेच्या वतीने खोडद ता. जुन्नर येथे सविनय प्रणाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘ आई: मुलांवरील संस्कार काल आणि आज ‘ या विषयावर व्याख्यान देताना शिंदे बोलत होते. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. ज्ञानेश्वर थोरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रा. लीला शिंदे, सरपंच मनीषा गुळवे, उपसरपंच योगेश शिंदे, अंबिका पतसंस्थेचे अध्यक्ष रोहिदास गायकवाड, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सुदाम गायकवाड, जगदंबा संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार काळे, कवी रमेश तांबे, विलास डुंबरे, बाळासाहेब शिंदे पाटील, चंद्रकांत पोखरकर, निवृत्ती थोरात, श्रीपत मुळे, पंढरीनाथ तांबे, गणपत वाळुंज आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी, कुसुम श्रीहरी सोमोशी व डॉ.रवींद्र श्रीहरी सोमोशी या मायलेकांना श्यामची आई व श्याम : गुणी मायलेक पुरस्कार, भाऊसाहेब कासार यांना साने गुरुजी सेवाव्रती पुरस्कार तर खोडद गावची सुकन्या सुवर्णपदक विजेती वेट लिफ्टर वैष्णवी मच्छिंद्रनाथ डोके हिला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रा.डॉ.रवींद्र सोमोशी म्हणाले की, “महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या क्रांतीमुळे समाजात आज महिला सन्मानाने जीवन जगत आहेत.फुले दांपत्य नसते तर महिला आजही घरातच राहिल्या असत्या, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे प्रत्येक महिलेवर अनंत उपकार आहेत.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.थोरात म्हणाले की, “मॅक्सिम गोर्की, केशव बोरकर यांच्या पुस्तकांतून आणि कवितांतून झालेले आईचे वर्णन हे मातृत्व, त्याग, कष्ट, लेकरांवरील निर्जाव्य प्रेमाची प्रचिती देतात.प्रत्येक माणसाने ही पुस्तके वाचून आई समजून घ्यायला हवी.संत साहित्याचा अनुभव जो व्यक्ती घेतो, तो नेहेमी आपल्या आई वडिलांवर नितांत श्रद्धा ठेवतो, त्यांच्यावर अपार प्रेम करतो.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्यामची आई सेवा समितीचे अध्यक्ष जालिंदर डोंगरे यांनी केले.मानपत्रांचे वाचन नीलम गायकवाड यांनी केले.सूत्रसंचालन सायली पोखरकर व राजकुमार डोंगरे यांनी केले.
==============================
“आत्मा आणि ईश्वर यांचे एकत्र दर्शन आईमध्ये घडते.आई हे जगातील सर्वश्रेष्ठ मातृत्व आहे.आई मुलाला कडेवर घेऊन जग दाखवते तर बाप मुलाला खांद्यावर घेऊन जगाची उंची दाखवतो.शिक्षक हा वर्तुळ काढतो, त्यात रेषा दिसत नाही पण समाज त्या रेषेमधील बिंदू विविध जातींमध्ये शोधत राहतो.”
– फ.मु.शिंदे, माजी अध्यक्ष,
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
==============================



