ताज्या घडामोडी

यशवंत पतसंस्थेची उभारणी आणि यशस्वी  वाटचाल

 

सन 1983 साली पुण्याहुन शिक्षण पुर्ण करुन आलो. ते नोकरी न करण्याच्या इराद्यानेच. आहे त्या शेतीमध्ये आधुनिकता आणुन सर्व बंधुसोबत काम करुन जीवनाची वाटचाल करण्याचे निश्चित केले. पिंपळवंडी परिसरात काही निवडक शेतकरी सोडले तर परंपरागत पध्दतीने शेतीची वाटचाल चालू होती. स्व. दत्तुबाबा लेंडे व स्व. वसंतराव पा. काकडे यांनी पुढाकार घेऊन कुकडी नदीवरुन सार्वजनिक उपसा योजना करण्याचे ठरविले आणि पावसाच्या पाण्यावर शेती करणा-या बळीराजाला नवीनवी स्वप्ने पडु लागली. उपसा पाणी योजना झाल्या, पण आपापसातील सामंजस्या अभावी ब-याच योजना बंद पडल्या, परंतु आता शेतकरी नव नव्या पिकांची स्वप्न पहात होता. काही शेतक-यांनी स्वतः वैयक्तिक पाणीपुरवठा योजना राबविल्या. तर ब-याचजणांनी वैयक्तिक विहिरी खोदुन शेतीला पाणी उपलब्ध केले. वर्षानुवर्षे कोरड्या जमीनींना पाणी मिळाले. आणि ऊस, केळी व भाजीपाला सारखी नगदी पिके शेतकरी घेऊ लागला. बागायती क्षेत्र वाढल्यामुळे आर्थिक चणचण भासू लागली. परिसरात हुंडेकरी व बँकातून भांडवले मिळणे दुरापास्त होते. भांडवलासाठी शेतकरी खाजगी सावकरांकडे वा फ़ंड, भिसी कडे याचना करु लागला. शेतीतून उत्पन्नांच्या आशेने शेतकरी पडेल त्या भावात भांडवल उभे करण्यास तयार होता.
याच कालावधीत गावोगावांत फ़ंड व भिश्यांचा सुळसुळाट झाला होता. पैशाला प्रचंड मागणी असल्याने गैरप्रकार वाढले होते. त्यातुन अनेक फ़ंड, भिशा बंद पडल्या होत्या. फ़ंड, भिशाच्या माध्यमांतून अनेक गरजुंचे शोषण उघड्या डोळ्यांनी पहात असताना, आर्थिक व्यवहारांना कायद्याच्या चौकटीत बसवून सर्वांना समान न्याय व सुरळीत पतपुरवठा होण्यासाठी अनेक समविचारी सहका-यांबरोबर विचार विनिमय सुरु झाला.
दिवसभर शेतीत राबून संध्याकाळी सर्व सहकारी व ज्येष्ठ मंडळी मा. पारसशेठ भटेवरा यांचे किराणा दुकानामध्ये जमत असु. त्यामध्ये श्री. राजाभाऊ घोटणे, श्री. जानकू तोतरे गुरुजी, श्री. पांडुरंग कोल्हे सर, श्री. संजय फ़ुलसुंदर, श्री. व्ही. के. रोहकले सर, श्री. फ़कीरभाई इनामदार, श्री. दिनकर पा. काकडे, श्री. शिवाजीराव काकडे, श्री. शांताराम वामन तसेच ज्येष्ठ म्हणुन श्री. तोतरे भाऊसाहेब आणि श्री. वायकर सर होते. तालुक्यात त्यावेळी एकही पतसंस्था कार्यरत नसल्याने जुजबी माहितीवर कामकाज सुरु केले. मुख्य प्रवर्तक म्हणुन माझी निवड करुन, शेअर्स गोळा करण्याचे कामकाज सुरु केले. प्रमुख मंडळींनी प्रत्येकी रु. 1000/- शेअर्स पोटी गोळा करत इतरांकडुन रु. 10/-शेअर्स पोटी गोळा केले. प्रत्येकाकडुन रु. 1/- प्रवेश फ़ी म्हणून गोळा केली. एकुण 227 सभासद होऊन रु. 65000/- भांडवलापोटी गोळा केले, अनेकांचे शेअर्स प्रमुख मंडळींनी स्वतः भरले. दरम्यान जुन्नर येथे सहाय्यक निबंधक कार्यालयात जाऊन नोंदणीचा आढावा घेण्यासाठी सर्वजण आलो. नोंदणीपत्र प्राप्त झाल्यानंतर गावातील विठ्ठल रुख्मिणी मंदिरामध्ये पतपेढीचा उद्घाटनाचा कार्यक्रम स्व. वसंतराव पा. काकडे यांचे अध्यक्षतेखाली व सहाय्यक निबंधक जुन्नर श्री. ठाकूरसाहेब यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. पतपेढ़ीचे उद्घाटन कार्यक्रमाचा खर्च फ़क्त रुपये 55/-एवढा होता.

दि. 14/04/1986 रोजी पहिली सभा होऊन त्यामध्ये स्व. वायकर सर यांची चेअरमन म्हणुन तर श्री. म. भा. वाघ यांची उपाध्यक्ष म्हणुन निवड झाली. प्रथम सभा मा. जानकू तोतरे गुरुजी यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. श्री. व्ही. के. रोहकले सर यांची महिना रु. 150/- पगारावर अर्धवेळ सेक्रेटरी म्हणुन नेमणूक करण्यात आली. पहिला ताळेबंद, भागभांडवल व प्रवेश फ़ी मिळून रु. 65,857/- व त्यातून सभासदांना कर्ज वाटप केले. त्यावेळी संस्थेला रु. 1097/-तोटा दि. 30/06/1986 रोजी दाखविण्यात आला. दुस-या आर्थिक वर्षात पतपेढी रु. 7500/- नफ़्यात आली. भागभांडवलामध्ये रु. 20000/- वाढ झाली होती. सभासदांना रु. 2000/- ते रु. 5000/- पर्यंत कर्ज वाटप केले जात होते. सन 1987-88 सालच्या 3 -या आर्थिक वर्षात संस्थेला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडुन रु. 100000/- कॅश क्रेडीट मिळाल्याने कर्ज वाटप वाढले. व नफ़ा रु. 10000/- पेक्षा जास्त झाला.
सन 1988-89 चे मासिक सभेत चेअरमन म्हणुन श्री. म. भा. वाघ यांची तर व्हा. चेअरमन म्हणुन श्री. जा. ना. तोतरे गुरुजी यांची निवड झाली. सभासदांसाठी कर्ज मर्यादा रु. 5000/- व रु. 15000/- पर्यंत करण्यात आली. पहिल्यांदाच छापील पुस्तक स्वरुपात संस्थेचा वार्षिक अहवाल छापण्यात आला. तसेच सभासदांकडुन ठेवी स्विकारण्याचे जाहीर करण्यात आले. तसेच सभासदांना 6 टक्के लाभांश वाटण्यात आला.
सन 1989-90 साली ठेव रुपाने संस्थेकडे रु. 5000/- गोळा झाले तसेच भांडवल तीन लाख रुपयापेक्षा जास्त झाले. संस्थेचे सेक्रेटरी श्री. रामभाऊ शंकर दांगट यांचे निधन झाल्याने श्री. ल. भा. मंडलिक यांची सेक्रेटरी म्हणून नेमणूक झाली. सन 1990-91 मध्ये भागभांडवल रु. 500000/- पर्यंत वाढ़ून, ठेवी रु. 200000/- पेक्षा जास्त झाल्या. तसेच कर्ज वाटप रु. 8 लाख पेक्षा जास्त झाले. सन 1991-92 मध्ये आणि कर्जात वाढ होऊन खेळते भांडवल 16 लाख रुपयांवर गेले. तसेच सोने तारण कर्ज योजना सुरु करण्यात आली.
1995-96 साली संस्था स्वः मालकीच्या अद्ययावत इमारतीमध्ये स्थिरावली. त्यावेळी संस्थेचे भांडवल 15 लाख रुपयांपेक्षा जास्त असुन ठेवी 42 लाख रुपये होते. तसेच कर्ज वाटप 38 लाख रुपये होते. 100 टक्के वसुलीचा यशवंत ध्वज मानाने फ़डकत होता. 1998-99 साली ठेवीचा 1कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला.
2005-06 साली 20 व्या आर्थिक अहवालात संस्थेच्या 5 कोटी ठेवींचा टप्पा ओलांडुन खेळते भागभांडवल 7 कोटी पर्यंत जाऊन पोहचले. सन 2002 मध्ये ना. शरदराव पवारसाहेब यांचे हस्ते संस्थेतील स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांचे पुतळ्याचे अनावरण झाले. तसेच महाराष्ट्र राज्य फ़ेडरेशन कडुन उत्कृष्ठ अहवाल स्पर्धेत राज्यात 1 ले बक्षिस मिळाले. 2006-2007 या आर्थिक वर्षात खेळते भांडवल 8.50कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले. यावर्षी संस्थेने नवीन दोन शाखा सुरु केल्या. तसेच योगायोग म्हणजे माझा 50 वा वाढदिवस सहका-यांनी धुमधडाक्यात साजरा केला.
2007-2008 हे संस्थेचे 23 वे वर्ष असुन प्रगतीचा आलेख सतत चढता राहिला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. आर. आर. पाटीलसाहेब यांनी आपल्या संस्थेला भेट देऊन यशवंतराव चव्हाणसाहेब यांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. संस्थेचे खेळते भांडवल 10 कोटी पर्यंत जाऊन पोहोचले. 2008-2009 ह्या 24 व्या आर्थिक वर्षात संस्थेने ठेवींचा 10 कोटीचा महत्वाचा टप्पा पार पाडला. एका वर्षात ठेवी 50 टक्के ने वाढल्या. मळगंगा मातेच्या समोर नवीन कार्यालयात कारभार बहरु लागला होता. 2009-2010 हे संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने संस्थेने सामाजिक जबाबदारी ओळखून सभासद व परिसरासाठी मोठ्या प्रमाणांवर विविध कार्यक्रम पार पाडले. रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांचा तुलशीरामायण कथा सोहळा, डी. वाय. पाटील रुग्णालयातर्फ़े मोफ़त सर्व रोग निदान शिबीर, कुमारीमाता व महिला प्रबोधन शिबीर, शेतकरी मेळाव्यात म. फ़ुले कृषी विद्यालयामध्ये शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, अनाथांची माता सौ. सिंधूताई सपकाळ यांचे मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रम पार पाडले. रौप्यमहोत्सवी वर्षात संस्थेचे खेळते भांडवल 15 कोटींवर जाऊन पोहोचले.
26 व्या आर्थिक वर्षात संस्थेचे प्रथम अध्यक्ष मा. वायकर सर तसेच संस्थेचे तज्ञ संचालक मा. निवृत्ती द. काचळे (सी.ए.) यांचे निधन झाले. मा. वायकर सर यांनी संस्थेला लावलेली कठोर शिस्त कायम स्मरणात राहील. या वर्षात संस्थेतर्फ़े आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला. वार्षिक सभेत गावचे उत्तरेकडील मोकळ्या जागेत यशवंत उद्यान उभारण्याचे ठरले. गावचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. शरदराव लेंडे यांनी याकामी प्रचंड कष्ट घेऊन यशवंत उद्यान उभारण्यास सहकार्य केले, त्याबद्दल संस्था त्यांची आभारी आहे.
27 व्या आर्थिक वर्षात संस्थेचे खेळते भांडवल 20 कोटीवर जाऊन पोहोचले. या आर्थिक वर्षात तालुक्याचे मा. आमदार व सहकार महर्षी स्व. शिवाजीराव काळे यांचे तसेच संस्थेचे शाखाप्रमुख स्व. सोपान देवराम कोकाटे यांचे दुःखद निधन झाले. संस्थेच्या वार्षिक अहवालात महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांचा जीवनपट छापून अनेकांचे धन्यवाद मिळाले. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य पतसंस्था फ़ेडरेशन आयोजित सहकार दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले. संस्था उभारत असलेल्या यशवंत उद्यानामध्ये स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांचा ब्रांझचा पुतळा उभारण्याचे ठरले. त्याकामी गावचे सरपंच, सदस्य, ग्रामस्थ व मा. शरदराव लेंडे यांचे भरघोस सहकार्य लाभले आहे. सतत 100 टक्के वसुलीचा यशवंत ध्वज अखंडपणे 27 व्या आर्थिक वर्षापर्यंत मानाने फ़डकवत ठेवण्यामध्ये अनेक हितचिंतक, सभासद, ठेवीदार, कर्जदार, जामिनदार, ग्रामस्थांचे सहकार्य मिळत आहे. ते असेच सतत मिळत राहो हि सदिच्छा.
सन 2012-2013 हे संस्थेचे 28 वे वर्षी, संस्थेने ऐन तारुण्यात पदार्पण केले. सिंहावलोकन करत असताना अनेक स्मृती जागृत होतात. 28 वर्षापुर्वी एका दुकानात संस्था स्थापण्याचे विचार मंथन झाले. समविचारी सहकारी एकत्र आलो त्यांना अनुभवी मा. तोतरे भाऊसाहेब व वायकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. स्थापना काळातील अनेक कटू-गोड स्मृती आठवतात, पिंपळवंडी विकास सोसा. चे चेअरमन पद मा. वायकर सर यांना नाकारल्याने जिद्दीने यशवंतचे चेअरमन पद त्यांना देण्यात आले. फ़क्त रु. 55/- मध्ये संस्थेचे उदघाटन झाले. स्व. वसंतराव पा. काकडे व सहा. निबंधक ठाकूर साहेब यांचे हस्ते विठ्ठल रुख्मिणी मंदिरात छोटासा कार्यक्रम झाला. संस्था अस्तित्वाला आली. व्यवहार करत असताना मा. पारसशेठ यांचे किराणा दुकान अपुरे पडू लागल्याने जागेची शोधा शोध सुरु झाली. गावात कोणीच भाड्याने जागा देईनात. स्वमालकीची इमारत होईपर्यंत संस्थेने 5 विविध ठिकाणी कार्यालये बदलली. परंतु माता मळगंगेचे कृपेने तिच्या प्रांगणातच संस्थेला जागा मिळाली.दि. 25/06/1994 रोजी स्वतःचे इमारतीची वास्तूशांती झाली आणि एकदाची स्थिरता आली. उद्घाटणासाठी ना. शरद पवार साहेब यांना आणण्याची इच्छा अखेर 2002 आली पुर्ण झाली. अनेक मान्यवरांनी पतसंस्थेस भेटी दिल्या, त्यामध्ये मा. बाबा आढाव, ज्येष्ठ समाजसेवक मा. आण्णा हजारे, मा. आर. आर. पाटील साहेब, सिंधूताई सपकाळ, मा. दिलीपराव वळसे पाटील साहेब, मा. शरदराव पवार साहेब यांचा समावेश आहे. काळाच्या ओघात काही जवळचे हितचिंतक सहकारी दुर गेले, काही दुरचे जवळ आले. आज संस्थेचा मागोवा घेताना त्याबद्दल खंत वाटते.
संस्थेच्या यशाचे गमक संस्थेची 100 टक्के कर्ज वसुली ठरली आहे. तालुक्याबरोबरच राज्यभर संस्थेच्या आदर्शवत कामकाजाची नोंद घेतली गेली. 1994 मध्ये आपल्या चांगल्या कामकाजाचा फ़ायदा इतरांना मिळावा या उद्देशाने तालुक्यामधील सहका-यांना बरोबर घेऊन जुन्नर तालुका पतसंस्था फ़ेडरेशनची स्थापना करण्याचे भाग्य आम्हास लाभले याचा अभिमान वाटतो.
अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर संस्थेने करत असताना त्यामध्ये आधुनिकिकरण करुन RTGS, NEFT, IMPS, वीज बील भरणा, लॉकर सेवा या सेवांचा अवलंब करुन बँकेच्या बरोबरीने सेवा देण्यास सुरुवात केली. ती अव्याहत चालू आहे.
सभासदाच्या सुख दुःखात सहभागी होण्यासाठी संस्था अग्रेसर राहिली आहे. अपघात विमा रु. 10 लाख / 40 लाख पर्यंत, सन 2014 पासुन अव्याहतपणे काढला जात आहे. त्याचा फ़ायदा वेळोवेळी सभासदांना झाला आहे.
संस्थेने 2015-16 पासुन “यशवंत पुरस्कार” देण्यास सुरुवात केली. समाजामधील अग्रगण्य कामकाज करणा-यांची नोंद घेऊन त्यांचा यथोचित गौरव केला जात आहे. त्यामध्ये पुरस्कारार्थी म्हणुन कर्मयोगी मा. केरुशेठ वेठेकर, मा. शरदराव लेंडे, मा. पांडुरंगजी कोल्हे सर, संगणक तज्ञ वसंतराव खोकले व पोलिस अधिकारी सुचेता खोकले, मा. वि. द. पाटील सर यांना देण्यात आला. पुरस्कार देण्यासाठी दिग्गज अशा विभुती लाभल्या त्यामध्ये मा. दिलीपराव वळसे पाटील, प्रज्ञा चक्षु ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर, शांतीब्रम्ह गुरुवर्य ह.भ.प.मारुती महाराज कु-हेकर (गोठेबाबा), ह.भ.प. पृथ्वीराज महाराज जाधव, ह.भ.प. तुळशिराम महाराज सरकटे, ह.भ.प. राजाराम महाराज जाधव, मा. ना. बाळासाहेब थोरात (मा. महसुल मंत्री महा. राज्य) व मा. सत्यशिलदादा शेरकर (चेअरमन, विघ्नहर सहकारी साखर कारखाना) यांचे हस्ते देण्यात आला. यशवंत पुरस्कार प्रदान करतेवेळी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे सहकारी मा. शंकरआप्पा संसुद्दी व मा. बाबुराव पाटील (स्वातंत्र्य सैनिक) यांचाही सहभाग लाभला आहे. सदरचा यशवंत पुरस्कार देण्याचा उपक्रम संस्थेने चालू ठेवला आहे.
संस्थेस आपल्या कामाची पावती महाराष्ट्र राज्य पतसंस्था फ़ेडरेशन, जुन्नर तालुका पतसंस्था फ़ेडरेशन यांचेकडुन वेळोवेळी मिळाली आहे. त्यांनी प्रतीवर्षी पुरस्कार देऊन गौरविलेले आहे. बँको पुरस्कारही संस्थेस मिळाले आहेत.
संस्थेच्या कामकाजाबरोबर समाजकारणामध्ये पिंपळवंडी गावचे “सरपंच” पद भुषवत आसताना पुणे जिल्हा परिषदेने सन 2016-17 मध्ये “आदर्श सरपंच” पुरस्कार दिला गेला. त्याचबरोबर 2017-18 मध्ये किल्ले शिवनेरी उत्सव समिती जुन्नर यांचेकडुन “शिवनेर भुषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या सर्व गोष्टीमध्ये आमचे यशवंत परिवाराचा मोलाचा सहभाग लाभला आहे. याचा अभिमान वाटतो. यशवंत पतसंस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांना, देशांना भेटी देण्याचा योग आला. त्यामध्ये नेपाळ, भुतान, बँकॉक – पटाया, गोवा इत्यादी ठिकाणच्या अभ्यासदौ-यांचा लाभ झाला आहे.
शासन धोरणानुसार 33 लक्ष वृक्ष लागवडीमध्ये संस्थेने सहभाग घेऊन वेळोवेळी 800 ते 1000 कलमी आंबे रोपे देण्यात आली.
दि.12/03/1986 रोजी सर्वांनी लावलेले रोपटे आज 37 व्या वर्षात दिमाखदारपणे उभे आहे. 65हजार रुपये भागभांडवलावर उभी राहिलेली पतसंस्था आज जवळपास रु. 125 कोटीच्या खेळत्या भांडवलावर उभी आहे. अनेकांचा त्याग प्रेम व आपुलकीची शिदोरी घेऊन वाटचाल चालू आहे. 5 शाखांचा विस्तार वाढत चालला आहे. संपुर्ण संगणकीकरण झाले आहे. जनमाणसांचा मोठा विश्वास संस्थेने मिळवला आहे. संस्थेवर जीवापाड प्रेम करणारे सेवक व संचालक यांचा अभिमान वाटतो. संस्थेला ISO 9001-2008 मानांकन प्राप्त झालेले आहे. सर्वांचा आत्मविश्वास वाढला आहे.
संस्थेच्या वाढत्या वाटचालीबरोबर संस्थेच्या भव्य अशा सुसज्य नवीन इमारतीचे बांधकाम सन 2018-2019 मध्ये सुरु केलेले आहे. दरम्यानचे काळातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बांधकाम पुर्णत्वास येण्यास वेळ लागला. सन 2023-24 ला संस्थेची सुसज्य अशी भव्य इमारत पुर्ण झाली आहे. प्रशस्त अंतर्गत पार्किंग, कंपाऊड, सभासद /ग्राहकांसाठी मोठे काऊंटर, स्वतंत्र केबीन, लॉकर कक्ष, वेगवेगळे मिटींग हॉल, गेस्ट हाऊस, टॉयटेल इ. सुविधा असुन संपुर्ण इमारतीस सोलर ची विद्युत तयार करुन वापरली जात आहे. आकर्षक अशी फ़र्निचरची रंगसंगती, सुंदर असे सुशोभिकरण असलेली सुसज्य इमारत प्रत्येकाला आनंद व समाधान देत आहे.
अशा या नुतन इमारतीचे उदघाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व सहकारमंत्री मा. दिलिपराव वळसे पाटील यांचे शुभहस्ते व तालुक्याचे आमदार मा. अतुलजी बेनके यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. त्याचबरोबर मा. शिरुर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोलजी कोल्हे, माजी खासदार मा. शिवाजीराव आढळराव पाटील, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फ़ेडरेशन चे अध्यक्ष मा. काकासाहेब कोयटे, महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त मा. अनिलजी कवडे, माजी आमदार मा. शरददादा सोनवणे, सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक मा. प्रकाश जगताप यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे याचा आनंद होत आहे.
दि. 06/11/1988 ला चेअरमनपदी निवड झाली. ती आजपर्यंत कायम आहे. जवळपास 35 वर्षे हा भार वाहत असताना संस्थेचा डौलदार वटवृक्ष पाहून श्रम निमालयासारखे वाटते. गावचे ग्रामदैवत माता मळगंगेच्या प्रांगणातच संस्था कार्यालय असल्याने तिच्या कृपेने हे चालले आहे. असा माझा ठाम विश्वास आहे. समाजाने सोपविलेली ही जबाबदारी अशीच अव्याहतपणे व पारदर्शकपणे पार पडो अशी माता मळगंगेच्या चरणी प्रार्थना करतो व शब्दांना विराम देतो.

शब्दांकन -श्री.महादेवशेठ भाऊसाहेब वाघ – (चेअरमन – यशवंत सहकारी पतसंस्था पिंपळवंडी )

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!