समर्थ विधी महाविद्यालय बेल्हे येथे विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न राष्ट्रीय व जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी कायद्याचे शिक्षण इंग्रजीत घ्या-ॲड.अहमद खान पठाण

बेल्हे (प्रतिनिधी) समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ विधी महाविद्यालय,बेल्हे येथे नुकताच नवोदितांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
समर्थ विधी महाविद्यालय आणि जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ॲड.पठाण यांची महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड.अहमद खान पठाण म्हणाले की,राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर प्रभावीपणे स्पर्धा करण्यासाठी कायद्याचे शिक्षण इंग्रजी भाषेत घ्यावे.तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे एक उपयुक्त साधन म्हणून स्वीकारावे.
महिला आरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियामध्ये ३० टक्के महिला प्रतिनिधित्व लागू होणार असल्याचे सांगितले.त्यामुळे भविष्यात विद्यार्थिनींनी बीसीआय निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन नेतृत्वाची भूमिका बजवावी,असे आवाहन त्यांनी केले.ॲड.पठाण यांनी आपला जीवनप्रवास उलगडला.ते म्हणाले, “मी एका शेतकरी कुटुंबातून आलो असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले.शिवजन्मभूमी जुन्नरचा सुपुत्र असल्याचा मला अभिमान आहे.मी शिवनेरीचा मावळा असून माझ्या तालुक्यातील विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे.” ग्रामीण भागात समर्थ विधी महाविद्यालय सुरू झाल्यामुळे कायद्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना जवळच उपलब्ध झाले आहे असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विवेक शेळके होते.प्रास्ताविका मध्ये प्राचार्य डॉ.सुनील कवडे यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची,शैक्षणिक प्रगतीची व संस्थेने शिक्षण क्षेत्रात घेतलेल्या वाटचालीची माहिती दिली.प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.सचिन दरेकर यांनी करून दिला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,तसेच जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.शिवदास तांबे,उपाध्यक्ष ॲड.अजीज शेख,ॲड.सुधीर कोकाटे,ॲड.मिथिलेश शिंदे,नूतन शेगर,तसेच वकील व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ॲड.सोनिया बोगावत यांनी केले तर आभार प्रा.शिवाजी कुमकर यांनी मानले.



