ताज्या घडामोडी
पिंपळवंडीत बिबट्याला जेरबंद करण्यात वनखात्याला यश
पिंपळवंडी -( दि १०) कैसास बोडके
गेल्या काही दिवसांपासून पिंपळवंडी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी येथील लेंडेस्थळ शिवारात वनखात्याने पिंजरा लावला होता आज शुक्रवारी ( दि १०) सकाळी या बिबट्याला जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले आहे
गेल्या चार ते पाच दिवसांपासून पिंपळवंडी परिसरातील लेंडेस्थळ काळवाडी काकडपट्टा या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता रविवारी ( दि ४) लेंडेस्थळ शिवारात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या महिलेवर हल्ला केला होता त्यामध्ये ही महिला गंभीर जखमी झाली आहे या घटनेनंतर बुधवारी ( दि ८) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास काळवाडी येथे एका आठ वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करुन ठार केले होते या दोन्हीही घटना ताज्या असतानाच गुरूवारी ( दि ९) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास काकडपट्टा शिवारात बिबट्याने कालवडीवर हल्ला केला गेल्या चार ते पाच दिवसांपासून पिंपळवंडी परिसरात सातत्याने बिबट्याचे हल्ले होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते बिबट्याचे सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली होती त्यानंतर वनखात्याने लेंडेस्थळ काळवाडी काकडपट्टा व पिंपरीपेंढार या ठिकाणी पिंजरे लावले होते दरम्यान लेंडेस्थळ या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात आज शुक्रवारी ( दि १०) सकाळी सात ते आठ वर्ष वय असलेला नर जातीच्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले असल्याची माहिती ओतुर वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली




