अठ्ठावीस वर्षानंतर झाली शालेय सावंगड्यांची भेट

पिंपळवंडी (प्रतिनिधी) – सुभाष विद्यामंदिर, पिंपळवंडी (इ. दहावी सन १९९६-९७) च्या विद्यार्थ्यांचा २८ वर्षांनंतर पहिल्यांदाच आयोजित गेट-टुगेदर कार्यक्रम अत्यंत आनंददायी वातावरणात पार पडला. जुन्या आठवणींना उजाळा देत, मित्रमैत्रिणींनी बालपणातील क्षण पुन्हा एकदा अनुभवले.
कार्यक्रमाचे आयोजन सुभाष विद्यामंदिर पिंपळवंडी शाळेच्या त्याच जुन्या दहावीच्या वर्गात करण्यात आले होते. प्रारंभी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सर्व मित्रमैत्रिणींची ओळख परत एकदा करून देण्यात आली. “मी कोण?” या मनोरंजक खेळासह कार्यक्रमात हशा, आनंद आणि भावनिक क्षण यांची पर्वणीच रंगली.
विद्यार्थ्यांनी आपापल्या आठवणी, शिक्षकांबद्दलच्या भावना आणि त्या काळातील गमतीजमती सांगत वातावरण अगदी भावुक केले. काहींनी शाळेच्या दिवसांच्या आठवणींवर आधारित कविता, गाणी सादर केली.
कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सर्व उपस्थितांनी “अशा भेटी वारंवार व्हाव्यात” असा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी श्याम माळी, संदीप बाम्हणे,गणेश फुलसुंदर, कुलदीप काकडे, अनिल रायकर,विजय गायकवाड,किरण लेंडे, प्रवीण लेंडे,चित्रा लेंडे /वाघ संदीप नाईक आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन सुप्रिया वामन/ कडूसकर यांनी मानले.



